सोलापूर : सोलापूरसह पुणे, अहिल्यानगरसाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, गुरुवारी दिवसभर ४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर, वीर धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. उजनी धरण गुरुवारी सांयकाळी ६ वाजता ३५.९३ टक्के भरले आहे. एकूण पाणीसाठा ८२.९० टीएमसी इतका असतो. सद्यस्थितीत प्लसमध्ये १९.२५ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे. यामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन होऊन दीड महिने उलटून गेले आहेत. पड पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहे. शेतात उभी असलेली केळी, डाळिंब, द्राक्ष, ऊस यासह अन्य पिकेही वाळून जात आहे. सुदैवाने इंद्रायणी नदी आणि पुणे घाटमाध्यावर अतिवृष्टीसदृश पाऊस पडल्याने उजनीमध्ये पाण्याचे आवक वाढली आहे.
बुधवारी सायंकाळी १ लाख १७ हजार ६४२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यात घट होऊन तो गुरुवारी सायंकाळी ६८ हजार ३०३ क्युसेक इतका झाला आहे. पाण्याचा प्रवाह अजून दोन दिवस राहिल्यास उजनीतील पाणी पातळी ही ५० टक्केपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूरसह मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
दरम्यान, वीर धरणातून बुधवारी दुपारी ३ वाजता ६ हजार ३७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता; परंतु पाऊस कमी झाल्याने तो विसर्ग रात्री ११०० क्युसेक करून गुरुवारी सकाळी पूर्णत: बंद करण्यात आला आहे.