Ujani dam Pudhari
सोलापूर

Ujani Dam: उजनी धरण प्लसमध्ये

पाणी पातळी आज २५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुणे आणि घाटमाध्यावर झालेल्या प्रचंड पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे बुधवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान उजनी धरणातील पाणीसाठा १७.२५ टक्के झाला. रविवारी (दि. ५) दौंडमधून एकूण २३.३१ टीएमसी पाणी धरणात आले. त्यामुळे सोलापुराकरांना दिलासा मिळाला.

धरणात रविवारी (दि. ५) उणे २७ टक्के पाणीसाठा होता. परंतु, इंद्रायणी नदीसह घाटमाध्यावर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी दौंडमार्गे उजनी जलाशयात मिसळत आहे. सुरुवातीला हा विसर्ग एक लाख ६४ हजार क्युसेकने होता. पाऊस ओसरल्याने दौंडमधील विसर्गात घट होऊन सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ९२ हजार ८९२ क्युसेकने सुरू होता. हा विसर्ग आणखी दोन ते तीन दिवस राहणार असून, उजनीतील पाणी पातळी आज २५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने आता उजनीतून पाणी सोडण्याची शक्यता मावळली आहे.

वीर धरणातून सहा हजार क्युसेक विसर्ग

वीर धरणातून नीरा नदीत सहा हजार ३७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीत नवीन पाणी येणार आहे. नीरा देवधर भाटघर, गुंजवणी प्रकल्प क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वीर धरणही ८७.२७ टक्के भरले असून धरणात ८.२१ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे नीरा उजवा कालवा विभागाने गुरुवारी दुपारी दोन वाजल्यापासून सहा हजार ३७ क्युसेकने विसर्ग सुरू केला. हे पाणी नीरा नरसिंहपूर येथे भीमा नदीत मिसळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT