Ujani Dam Pudhari
सोलापूर

Solapur AI Data Centre : ‘उजनी’च्या परिसरात उभारणार एआय डेटा सेंटर

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची माहिती; दीड लाख कोटीची गुंतवणूक होणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटर आणि सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, प्रकल्पासाठी एक गुंठाही खासगी जमीन संपादित केली जाणार नाही. भीमानगर, तरटगाव आणि हिंगणगाव या परिसरात प्रस्तावित असलेला हा प्रकल्प २०३१ पर्यंत साकारण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाच्या मालकीची ५६८ हेक्टर जमीन एमआयडीसीकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खासगी शेतकऱ्यांची एक गुंठाही जमीन संपादित केली जाणार नाही, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, जलसंपदा विभागाच्या जमिनीवर सध्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. प्रकल्पाची उभारणी करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच प्रकल्पासाठी उजनी धरणातून दरवर्षी केवळ अर्धा टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन आहे.

उजनीतील पाण्यावर पहिला हक्क पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा राहणार आहे. या दोन्ही गरजा पूर्ण केल्यानंतरच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास या प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्यात सर्वप्रथम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या पाणी हक्कावर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

एकूण प्रस्तावित गुंतवणूक : दीड लाख कोटी रुपये

प्रकल्पाचे नियोजित ठिकाण : भीमानगर, तरटगाव, हिंगणगाव परिसर

प्रकल्प पूर्णत्वाचे उद्दिष्ट : २०३१

जलसंपदा विभागाची जमीन : ५६८ हेक्टर

खासगी जमीन संपादन : एक गुंठाही नाही

वार्षिक पाणी वापर : अर्धा टीएमसी

स्थानिकांना थेट रोजगार : २ हजार ८००

अप्रत्यक्ष रोजगार : ४० हजार

राज्य शासनाला अपेक्षित महसूल : सुमारे २०० कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT