माढा : समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी सेवाभाव, सातत्य आणि नि:स्वार्थ वृत्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. भारत सरकार व विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या 2000 मेट्रिक टन क्षमतेच्या अत्याधुनिक कोल्ड स्टोरेज प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे होते. यावेळी मार्गदर्शन करताना पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील आदिवासी समाजासाठी सुरू असलेल्या आरोग्य, शिक्षण व स्वावलंबन विषयक कार्याची माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यात विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शेतकरी-केंद्रित आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचे डॉ. आमटे यांनी विशेष कौतुक केले. शेतकऱ्यांना संघटित करून आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा असून, इतर भागांसाठीही तो मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. राजीव मराठे यांनी डॉ. आमटे यांच्या सामाजिक कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. माध्यमांपासून दूर राहून वनवासी समाज आणि वन्यजीवांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींमुळेच समाजाची खरी प्रगती घडते, असे त्यांनी सांगितले. तसेच विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज रमेशराव शिंदे यांनी तरुण वयात सुरू केलेल्या सामाजिक व शेतकरीहिताच्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
नितीन कापसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सामाजिक चळवळीचे विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे, निमगाव टें. येथील सरपंच यशवंत शिंदे, शारदा ताई शिंदे, अजित कुलकर्णी, संस्थेचे संचालक, सभासद शेतकरी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. बडवे, पोपट खापरे, विनोद केळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.