पोखरापूर : शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरानजीक असलेल्या एका धाब्यासमोर चारचाकीमध्ये दोन ईव्हीएम व दोन कंट्रोल युनिट आढळून आल्याने गोंधळ उडाला होता. याप्रकरणी प्रशासनाने संबंधितांकडून खुलासे घेतले आहेत. चौकशीनंतर कारवाई होणार असून, खासगी गाडीचा चालक दिनेश भांगे याच्यावर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व 12 पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया दि. 7 फेब्रुवारी रोजी पार पडली, त्याच रात्री 11 च्या सुमारास मोहोळ शहरानजीक असलेल्या एका धाब्यासमोर कारमध्ये दोन ईव्हीएम व दोन कंट्रोल युनिट असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी कुरुल जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना दिली. पाटील यांनी तात्काळ कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा दाखल झाला होता. दरम्यान, उमेश पाटील यांनी यासंदर्भात नेमका हा काय प्रकार आहे? माझ्याच गटातील मशीन हॉटेलच्या समोर असलेल्या कारमध्ये कशा आल्या असे प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी होळकर यांनी पंचासमक्ष जागेवरच पंचनामा करून मशीन ताब्यात घेतल्या. यावेळी मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे आदींसह महसूल आणि पोलिस प्रशासनातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
55-कुरुल केंद्रांतर्गत नेमलेले क्षेत्रीय अधिकारी प्रसाद माणिक पाटील यांना दोन राखीव कंट्रोल युनिट आणि दोन बॅलेट युनिट देण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर ही यंत्रे त्यांनी सुरक्षा कक्षात जमा करणे आवश्यक होते, परंतु ती वेळेत जमा झाली नाहीत. जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला गेला, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांचा चालक त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, मतदान यंत्रे असलेल्या गाडीसह संबंधित ढाब्यावर निघून गेला होता. ढाब्याबाहेर गाडीत मतदान यंत्रे असल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर तिथे गर्दी जमली.
संबंधितांचे घेतले खुलासे; चौकशीनंतर होणार कारवाई
निवडणुकीत मतदान यंत्रांची काळजी घेण्याचे काम हे नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आहे. मोहोळ तालुक्यात एका धाब्यासमोर सापडलेल्या मतदान यंत्रांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासे मागविले आहेत. चौकशी झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) संतोष देशमुख यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी शनिवारी 66 टक्के मतदान झाले. शनिवारी रात्री मतदान संपल्यानंतर दहाच्या सुमारास मोहोळ शहराजवळील पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वराज्य धाब्याच्या बाहेर मतदान यंत्र कुरुल गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेश पाटील यांना आढळून आले. त्यामुळे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
मतदान यंत्राची काळजी घेणं, हे आमचं कर्तव्य आहे. आमच्या अधिकाऱ्याकडून चूक झाली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. संबंधित अधिकाऱ्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करत आहोत. वस्तुस्थिती काय आहे, याची स्थानिक अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहोत. संबंधित अधिकाऱ्यांचे खुलासे घेतलेले आहेत. संबंधित प्रकरणाचा पंचनामा करण्यात आला आहे. वाहनचालकाने हलगर्जीपणा केला असे आम्हाला वटतंय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पूर्ण चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.