सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन मॉडर्न, तीन आदर्श शाळा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मंगळवारी (दि.१) पत्रकार परिषदेत दिली आहे.
सीईओ जैन म्हणाले, पीएम श्री योजना अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक शाळा मॉडर्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना अंतर्गत एक मॉडर्न आणि तीन आदर्श शाळा बनविण्यात येणार आहेत. तसा सूचना देण्यात आल्या असून, त्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. तसेच इतर शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
जलजीवनचा सहा कोटी २१ लाखांचा निधी वाटप
जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांसाठी सहा कोटी ८१ लाखांचा निधी आला होता. त्यातील सहा कोटी २१ लाखांचा निधी वाटप करण्यात आला असून, निधी वाटपात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे.
बबलाद शाळेला पर्याय
बबलाद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सोय समाज मंदिरात केली आहे. त्यातच त्या शाळेचा अहवाल धोकादायक आला असून, विद्यार्थ्यांना पर्यायारी व्यवस्था केली जाणार असल्याचे सीईओ जैन यांनी सांगितले.
शिक्षकदिनीच पुरस्काराचे वितरण
आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी आलेल्या प्रस्तावांची पडताळणी सुरु आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शिक्षकदिनीच आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे सीईओ जैन यांनी सांगितले.
गणवेश तपासणीअंती निधी
गणवेशासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे गणवेश तपासणी झाल्यानंतर निधीचे वाटप होणार आहे. हलक्या दर्जाच्या गणवेशाबाबत निधी थांबविण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी सांगितले.