सोलापूर : नई जिंदगी येथील हमाली करणाऱ्या व्यक्तीच्या घरातून सोनेचांदीचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या डी.बी. पथकाने २४ तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम व मोटारसायकल असा सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
गौरीशंकर नागनाथ कोळी (वय ५५, रा. बसवेश्वरनगर, नई जिंदगी, सोलापूर) यांचे घर फोडून चोरट्यांनी २८.९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३६५ ग्रॅम चांदीचे दागिने व रोख २५ हजार रुपये असा पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. या प्रकरणात जिबरान उर्फ शोएब युनूस शेख (२१, सध्या रा. नई जिंदगी सोलापूर) व प्रशांत नागेश खंदारे (१९, रा. केशव नगर, सोलापूर) यांना ताब्यात घेतले.
एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याचे व. पोलिस निरीक्षक भाऊराव बिराजदार, संगीता पाटील यांच्या सूचनेने डी.बी. पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकातील हवालदार अमर शिवसिंगवावले, नागेशसिंह चव्हाण यांनी बसवारुढ मठ जवळील शांतीनगर येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
दागिन्यासह सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अवघ्या २४ तासांच्या आत हा गुन्हा उघउकीस आणला. पोलिस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त प्रितम यावलकर, सहा. आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली अल्फाज शेख, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिध्द निंबाळ, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिघोळे यांनी ही कामगिरी केली.