सोलापूर : महापालिकेच्या बांधकाम विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकाच क्रमांकाचा वापर दोन वेगवेगळ्या मिळकतींसाठी बांधकाम परवाना देताना करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.
कागदपत्रांनुसार, पाच्छा पेठ परिसरातील अंबादास गांगजी यांच्या मिळकतीसाठी आणि विजापूर रोडवरील बिलालनगर परिसरातील जगन्नाथ शिंगे यांच्या गुंठेवारी बांधकामासाठी एकाच परवाना क्रमांकाचा वापर (BPA4732020R434/23) करण्यात आला आहे. दोन स्वतंत्र मिळकतींसाठी एकच परवाना क्रमांक कसा वापरला गेला, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकारामागे तांत्रिक त्रुटी आहे की अन्य काही, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. याच प्रकरणात महापालिकेचे परवानाधारक खासगी अभियंता यांचे नावही समोर आले आहे. त्यांच्या लेटरहेडवर आणि स्वाक्षरीने बांधकाम वापर परवानासदृश कागदपत्र जारी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. बांधकाम वापर परवाना देण्याचा अधिकार महापालिकेच्या संबंधित विभागाकडे असताना खासगी अभियंत्याच्या लेटरहेडवर असे कागदपत्र कसे देण्यात आले, हीदेखील शंका आहे.
याशिवाय संबंधित बांधकाम परवान्याच्या विकास शुल्काच्या पावत्या उपलब्ध नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शुल्क भरूनच परवानगी देण्यात आली होती का, तसेच संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पडली होती का, याची पडताळणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सामान्य नागरिक बांधकाम परवानगीची प्रक्रिया परवानाधारक अभियंत्यांवर विश्वास ठेवून पूर्ण करतात. त्यामुळे अशा प्रकारांमुळे नागरिकांची तसेच महापालिकेच्या महसुलाची फसवणूक होत आहे का, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे. महापालिकेत पारदर्शक व स्वच्छ कारभार होईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या नागरिकांची घोर निराशा होत असल्याचे सध्या चित्र आहे. यामध्ये नव्याने कारभारी बनलेल्या पदाधिकारी व प्रशासनाने सर्वच विभागातील कारभारात सुधारणा करणे गरजेचे आहे.