सोलापूर : राखी पौर्णिमेसाठी बहीण भावाकडे अथवा भाऊ बहिणीकडे जात असतो. यंदा राखी पौर्णिमेच्या दरम्यान सलग सुट्ट्या आल्या आहेत. सलग सुट्ट्यांचा विचार करता बहिणींची गर्दी वाढणार आहे. यामुळे परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाअंतर्गंत असलेल्या विविध आगारातून वेगवेगळ्या मार्गावर साठ बसेसची अतिरिक्त सोय केली आहे. राखी पौर्णिमेनिमित्त ये-जा करणाऱ्या बहिण भावांचा प्रवास सुखकर आणि वेळेत व्हावा म्हणून महामंडळाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
बहीण भावासाठी दिवाळी व राखी पौर्णिमा हे दोन सण महत्त्वाची आहेत. बहीण भावाकडे राखी बांधायला जाते अथवा काहीवेळा भाऊही बहिणीकडे राखी बांधून घेण्यासाठी जात असतो. मात्र, यंदा राखी पौर्णिमेच्या दरम्यान सलग दोन तीन सुट्ट्या एकत्र आल्याने या पौर्णिमेनिमित्त ये-जा करणाऱ्या बहीण भावांची गर्दी वाढणार असल्याने महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या ९ आगारातून वेगवेगळ्या मार्गावर वाढीव साठ बसेस सोडण्यात येणार आहेत. ही व्यवस्था प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा विचार करून अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली आहे.
जादा बसेस सोडणार
परिवहन महामंडळाच्या येथील विभागीय कार्यालयाअंतर्गत मध्यवर्ती बस स्थानकातून सोलापूर -पुणे, पंढरपूर-पुणे, पंढरपूर-शिंगणापूर यासह अन्य मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या अतिरिक्त बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू राहतील.
आगागरनिहाय बस
सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक - ५, पंढरपूर - ७, बार्शी - ९ अक्कलकोट - ५, करमाळा - ६, अकलूज - ८, सांगोला - ९, कुर्डवाडी - ५ आणि मंगळवेढा - ६ असे एकूण ६० बसेस सोडण्यात येणार आहेत.