संजय कुलकर्णी
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या गेल्या पंधरा दिवसांपासून येथे सुरु असलेल्या अश्विनी यात्रेची सांगता मंगळवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी मंदिरात पार पडलेल्या मातेच्या छबिना मिरवणुकीने झाली.
यावेळी निघालेल्या भव्य-दिव्य छबिना मिरवणूकीसमोर सोलापूर येथून प्रतिवर्षी येणार्या मानाच्या काठ्या सज्ज झाल्या होत्या.या सोहळ्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ.कीर्ती किरण पूजार हे सपत्नीक सहभागी झाले होते.सोलापूर येथील शिवलाड तेली अंबाबाई मंदिराच्या दोन मानाच्या काठ्यांचे सर्व मानकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो उदो.. सदानंदीचा उदो उदो च्या जयघोषात मातेची छबिना मिरवणूक काढण्यात आली.यावेळी लाखों भाविकांचा जनसागर उसळला होता.या पोर्णिमेच्या रात्री काठ्यांच्या मानकर्यांकडून मातेची यथासांग महापूजा पार पडली.मातेच्या छबिना मिरवणुकीनंतर मंदिर संस्थानच्या वतीने काठ्यांच्या मानकर्यांचा भर पेहराव आहेर देवून सन्मान करण्यात आला.
महंतांकडून मंदिरात मातेचा जोगवा छबिना मिरवणूक पार पडल्यानंतर मातेचे महंत हमरोजीबुवा यांनी मंदिरातील धार्मिक पूजाविधी पार पडल्यानंतर हातामध्ये झोळी घेऊन मंदिरात परिसरात मातेचा जोगवा मागून या यात्रेची सांगता केली.यावेळी प्रक्षाळ मंडळासह, असंख्य आराधी,भक्तमंडळी यामध्ये सहभागी झाले होते.यात्रेनंतर महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रमधून आलेल्या भाविकांनी परतीची वाट धरली. यात्रेनंतर ठिकठिकाणी स्वच्छया मोहीम राबविण्याची जबाबदाती प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे.
अन्नदान महाप्रसादाचे वाटप
आज अश्विनी पौर्णिमेच्या सांगतेला मंदिर संस्थानच्यावतीने अन्नदानाचे (महाप्रसाद)वाटप करण्यात आले. बुधवारी सायंकाळीही सोलापूरच्या काठ्यांसह मंदिर परिसरात मातेची छबिना मिरवणूक पार पडली.आज शहरातला पोलिस बंदोबस्त काढून घेण्यात आल्याने मातेची दोन्ही महाद्वारे भाविकांसाठी मोकळी झाली होती.पंधरा दिवसापासून भाविकांना मातेच्या दर्शनासाठी घाटशीळ वाहनतळ मार्गे दर्शन मंडपात सोडण्यात येत होते.आज महाद्वारातून मंदिरात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने भाविक आनंदित होते.