सोलापूर : जेलरोड पोलिसांनी बुधवार बाजार परिसरात कारवाई करून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी अजीज निजाम कलबुर्गी (वय ६०, रा. साखर पेठ, बुधवार बाजार, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नंदिनी हिरेमठ यांनी याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कुलबुर्गीच्या ताब्यातील दुकानाची तपासणी केली असता प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले.
या कारवाईत एकूण २३ हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री करण्यास बंदी आहे. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जेलरोड पोलिस करीत आहेत.