टेंभुर्णी : -दवाखान्यात ॲडमिट असताना चोरट्यांनी डाव साधला. चौभे-पिंपरी (ता.माढा) येथे धाडसी चोरी झाली आहे.या घटनेत अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून कपाटात ठेवलेले तब्बल सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने,तीन जोड चांदीचे पैंजण,दहा हजार रु.रोख रक्कम असा एकूण तीन लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज ३१ जुलै रोजी सायंकाळी ०७ ते रात्री १० वा.सुमारास चोरून नेला आहे.
चौभे पिंपरी येथील देवकर वस्ती येथे ही भयंकर घटना घडली आहे.या घटनेने खळबळ उडाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,चौभे-पिंपरी येथील संजना श्रीधर जगताप (वय-३०) वर्षे,रा.देवकरवस्ती चौभेपिंपरी (ता. माढा) या घटने दिवशी ३१ जुलै रोजी आजारी असल्याने दवाखान्यात ॲडमिट होत्या. सायंकाळी त्यांचे पती गाईचे दूध काढून डेअरी मध्ये जमा करून फिर्यादीस आणण्यासाठी दवाखाण्यात गेले.
रात्री १० वा.सुमारास दोघे घरी आले असता घराचे दार उघडे व कडी कोयंडा तोडलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता कपाट उघडे होते. तसेच कपाटातील ड्राव्हर उचकटलेला दिसून आला. यावरून चोरी झाल्याचे दिसून आले. या घटनेत अज्ञात चोरट्याने कपाटातील ४५ ग्रॅम वजनाचे व ०२ लाख २५ हजार रु.किमतीचे सोन्याचे गंठन,७५ हजार रु.किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पट्टीची डिझाइन असलेले मिनी गंठन,५० हजार रु.किमतीचे १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, वीस हजार रु.किमतीचे तीन जोडी चांदीचे पैंजन, दहा हजार रु.रोख रक्कम त्यामध्ये पाचशे, दोनशे व शंभर रु.किमतीच्या नोटा, आठ कुलूपाच्या चाव्या असा एकूण तीन लाख ८१ हजार शंभर रु.किमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
या घटनेची संजना श्रीधर जगताप यांच्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या ठिकाणी ठसे तज्ञ व श्वान पथक यांनी भेट दिली आहे. यापूर्वी ही अनेक बंद घरे फोडून चोरट्यानी मौल्यवान ऐवज व रोख रकमेवर डल्ला मारला आहे. मात्र चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या घटनेचा अधिक तपास पोनि बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई गणपत सरडे हे अधिक तपास करीत आहेत.