सोलापूर : येथील शुक्रवार पेठ परिसरात एका वृद्ध महिलेला पोलिस असल्याचे (तोतया) भासवून दोन अज्ञात इसमांनी पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली.
किरण विजय वनारोटे (वय 78, रा. श्रद्धानंद तालीम जवळ, हॉटेल सात्त्विक समोरचा बोळ, शुक्रवार पेठ, सोलापूर) असे वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या आपल्या घरासमोर खुर्चीवर उन्हात बसल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याजवळ येत ‘आम्ही पोलिस आहोत. तुम्ही हातात पाटल्या आणि बांगड्या घालून का बसला आहात? त्या काढून ठेवा नाहीतर महिला पोलिस बोलावून तुम्हाला घेऊन जातो,’ असा धमकीवजा इशारा देत फसवणूक केली. त्या महिलेला विश्वास बसल्याने त्यांनी दागिने काढून ठेवण्याचा प्रयत्न केला असता, दोघा इसमांनी त्यांच्या हातातील दागिने हिसकावून पळ काढला.
डाव्या हातातील तीन तोळे वजनाची सोन्याची पाटली, डाव्या हातातील दोन तोळे वजनाची सोन्याची बांगडी असे एकूण पाच तोळे सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.