सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कामकाजाचे पदभार बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याकडे आहे. मात्र, बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांनी मुख्यालयातील साफसफाईचे टेंडर काढले. त्यामुळे या विभागाचा अजब कारभार पुढे आला असून, याकडे जि. प. अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांचे दुर्लक्ष होत आहे.
जि.प.च्या मुख्यालयातील कामे करण्याचा पदभार बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता खराडे यांच्याकडे होता. मात्र, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तो पदभार बांधकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्याकडे दिला. तेव्हापासून मुख्यालयातील कामे कुलकर्णी पाहत आहेत. परंतु अधून-मधून बांधकाम एकचे कार्यकारी अभियंता हे मुख्यालयातील विविध कामे मंजूर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पदभार कुलकर्णी आणि कामे मंजूर खराडे करत असल्याने दोन्ही अभियंत्यांमध्ये सातत्याने वाद होत असून, यावर तोडगा काढण्यासाठी ना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ना मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वेळ नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन, अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर हे चांगल्या प्रकारे कामकाज करत असताना बांधकाम विभागाचे दोन्ही कार्यकारी अभियंत्यांमध्ये कायम धुसफूस होत असल्याने बांधकाम विभागाबरोबरच जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे.