सोलापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 2) 499 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. दरम्यान, अक्कलकोट, सांगोला, मोहोळ व अकलूज येथील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदारांना रांगा लावून जवळपास तासभर प्रतीक्षा करावी लागली. सांगोल्यात तीन मतदान केंद्रांवरील तीन मतदान मशिन बदलण्याची नामुष्की यंत्रणेवर आली.
मतदान यंत्रात बिघाड निर्माण झाल्याने यावेळी राजकीय आरोप व प्रत्यारोपही करण्यात आले. अकलूज येथील मतदान केंद्रातील मतदान यंत्र माजी आमदार राम सातपुते यांच्यामुळे बंद पाडण्यात आल्याचा आरोप जयसिंह मोहिते-पाटील यांनी केला. यामुळे मतदारांना रांगा लावून उभारावे लागल्याचे चित्र मतदान केंद्रावर दिसले. अक्कलकोट येथील उर्दु प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात सकाळीच मतदान यंत्रात बिघाड झाले. त्यामुळे मतदान यंत्र दुरुस्ती होईपर्यंत सुमारे तासभर मतदारांना रांगेत उभा राहावे लागले.
सांगोला येथील विद्या मंदिर प्रशाला, जि. प. शाळा, धनगर गल्ली व जि. प. शाळा, भोपळे रोड येथील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने या तिन्ही ठिकाणी युनिट बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. यामुळे मतदारांना मतदान केंद्रात मतदानासाठी रांगेत प्रतिक्षा करावी लागली.
सोलापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह दिसून येत होता. दुपारी तीनपर्यंतच 50 टक्केमतदारांनी मतदानाचा हक्कबजाविला. सायंकाळच्या सत्रातही मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याची माहिती समोर आली आहे.