मोहोळ : मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील घाडगे वस्ती परिसरात मोहोळ - वैराग रस्त्यावर मोहोळहून धाराशिवकडे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेला वासरे व एका गायीने भरलेला ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती वाळुज येथील पोलिस पाटलांना मिळतात त्यांनी मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. मोहोळ पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत एका वासराचा व एका गाईचा गळा कापण्यात आल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक चौकशीत संबंधित दहा टायर असलेला ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर अनेक जिवंत वासरे परिसरात विखुरलेली व फिरताना आढळून येत आहेत. घटनेचा पंचनामा करण्याचे काम मोहोळ पोलिसांकडून चालू असून एकूण वासरे मोजण्याचे काम सुरु आहे.
या घटनेमुळे वाळूज, देगाव परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात असून प्रशासन झोपले आहे का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे? संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मोहोळ पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.