सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असतानाच शनिवारी उन्हाचा पारा वाढला. यावेळी सुमारे ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाड्याने शहरवासिय हैराण झाले होते.
गुरुवारी रात्री मंगळवेढा, सांगोला तालुक्यातील काही गावांत भागात मध्यम पाऊस झाला. तर शनिवारी पहाटे सोलापूर शहर परिसरात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. हवामान विभागाकडे केवळ २.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवेत आर्द्रता ५१ टक्के असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाने अपेक्षित सातत्य न ठेवल्याने खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ढगांची दाटी होत असली तरी पाऊस मात्र हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागत आहे.
सोलापूर शहरातही पावसाने हजेरी लावली. मात्र हा पाऊस सर्वदूर नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अजूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शनिवारी पुन्हा दिवसभर उन्हाचा पारा वाढल्याने चिंतेचे ढग तसेच आहेत.
पावसाअभावी पिकांवर संकट
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसात खंड पडत असल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह विविध पिकांना पावसाची गरज आहे. सध्या पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असल्याने आणखी पावसाचा खंड पडल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.