सोलापूर : शहर जिल्ह्यातील तापमानाचा पारा 41.1 अंशांवर आहे. गेल्या काही दिवसात तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून मंगळवारी (दि. 5) तापमान 41.1 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सकाळपासूनच कडक उन्हाची सुरुवात होत आहे. दुपारपर्यंत उष्णतेची तीव्रता अधिक वाढत आहे. उकाडा आणि गरम वाऱ्यांमुळे नागरिकांना बाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कामगार वर्गाला उन्हाचा मोठा फटका बसत आहे.
शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते दुपारच्या सुमारास निर्मनुष्य दिसत आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसत आहे. दरम्यान, उष्णतेमुळे थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी पिण्यावर नागरिकांचा भर दिसत असून ज्युस सेंटर, ज्युस गाड्यांवर नागरिकांची गर्दी दिसत आहे.