सोलापूर

Solapur Legislative Council election: विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स

पालकमंत्री गोरे, राऊत यांचा एकत्रित विमान प्रवास

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आमदाराबाबत भाजपने उमेदवारीबाबत अद्याप सस्पेन्स ठेवले असून, पालकमंत्री जयकुमार गोरे, बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत यांचा शुक्रवारी मुंबई ते सोलापूर एकत्रित विमानातून प्रवास केल्याचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावरुन राजकीय चर्चेंना ऊत आला आहे.

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूरमध्ये भाजपकडून उमेदवार कोण, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यात प्रामुख्याने माजी आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजेंद्र राऊत, माजी आ. राजन पाटील, माढ्याचे रणजितसिंह शिंदे, माजी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.

पालकमंत्री गोरे आणि माजी आ. राऊत यांनी विमानप्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी रात्री बार्शीमध्ये राऊत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केल्याची चर्चा सुरू आहे. तसेच राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. परंतु दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राऊत यांच्यासाठी बार्शी मतदारसंघ आहे, परंतु प्रशांत परिचारक यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने त्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची रणनीती पाहता माढा लोकसभेत भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. माढा लोकसभेच्यादृष्टीने माढा किंवा पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने कमकुवत आहेत. त्यामुळे भाजप तिकडे लक्ष केंद्रित करण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT