सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या सोलापूरकरांना मंगळवारी (दि.19) काहीसा दिलासा मिळाला. शहराच्या तापमानात 2.7 अंश सेल्सिअसने घट नोंदविण्यात आली आहे. मंगळवारी कमाल तापमान 40.9 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले.
यापूर्वी तापमानाचा पारा 44 अंशांवर गेल्याने नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. मंगळवारी तापमान कमी होते. परंतु उकाडा कायम असल्याने नागरिक हैराण होत आहेत. हवामानातील बदलामुळे नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला असला तरी उष्णतेचा प्रभाव अद्याप कायम आहे. दुपारच्या वेळेत उकाडा जाणवत असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना पाणी प्यावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे आणि अनावश्यक प्रवास टाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची ही तीव्र लाट पाहता नागरिकांनी दुपारच्या वेळी (12 ते 4) अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. मे महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानाचा हा आलेख आणखी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.