सोलापूर : सोलापूरचे तापमान गत सात दिवस सतत नवनवे विक्रम करीत आहे. शुक्रवारी याला ब्रेक लागला असून तापमान 1.2 अंशानी घटले. शुक्रवारी 42.2 अंश सेल्सिअस नोंद झाली.
गुरूवार 16 एप्रिल रोजी 43.4 अंश सेल्सिअस तापमान होते. यात किंचित घट झालेली असली तरी वातावरणात धग कायम आहे. वाढत्या उष्णतेच्या झळांमुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. दिवसभर वातावरणात ढगाळ होते. अधूनमधून सूर्याचे दर्शन घडत होते. परंतू वातावरणात तप्त झळा वाहत होत्या. एप्रिल महिना हा सर्वाधिक उष्णतेचा महिना ठरला आहे. उष्णतेच्या झळामुळे शरिरातील पाण्याची पातळी कमी अंगाची लाहीलाही होत असून नागरीक आजारी पडत आहेत.
उष्माघाताच्या भितीने रस्ते निर्मनुष्य होत असून, वाढत्या तापमानाचा फटका बाजार पेठांवरही झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.