टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा : बँकेतून पीक कर्जाची रक्कम घेऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या शेतकऱ्यास दोन भामट्याने अडवून त्यांच्याकडील ९० हजार रुपये रक्कम दमदाटी करून लुटले. ही घटना टेंभुर्णी-कुर्डुवाडी रोडवर गुरूवारी (दि. २७) घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण आत्माराम सरक (वय ६०, रा. बादलेवाडी, ता. माढा) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, लक्ष्मण सरक यांनी गुरुवारी टेंभुर्णी येथील माढेश्वरी अर्बन बँकेतून ९० हजार रुपये पीककर्ज म्हणून रक्कम काढली होती. ही रक्कम घेऊन सरक हे गुरुवारी दुपारी टेंभुर्णी-कुर्डुवाडी रोडने दुचाकीवरून जात होते. ते तांबवे (टें) गावच्या हद्दीतील खटके वस्तीजवळ आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात दोन जणांनी त्यांची मोटारसायकल सरक यांच्या दुचाकीस आडवी लावून त्यांना थांबविले. तसेच सरक यांना दमदाटी करीत त्यांच्याकडील रक्कम मागितली. सरक हे एकटेच असल्याने व अचानक घडलेल्या घटनेने घाबरल्याने त्यांनी चोरट्यांना रक्कम देऊन टाकली. सरक यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात येऊन चोरीची फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास कुलदीप सोनटक्के करीत आहेत.