टेंभुर्णी : येथील विपिन कृषी भांडार या रासायनिक खते व बी बियाणे दुकानाच्या गोडाऊनला आग लागून खते, औषधे यांच्यासह वाहने जळाल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
टेंभुर्णी येथे पुणे-सोलापूर जुन्या महामार्गावर शिवगौरी कॉम्प्लेक्स जवळ विपिन कृषी भांडार हे विपिन दोशी यांचे मोठे शोरूम आहे.याठिकाणी दुकानाच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये सकाळी धूर येत असल्याचे शेजाऱ्यांनी दोशी यांना फोन करून सांगितले.दोशी यांनी आग पाहिली असता आगीचा मोठा भडका झाल्याचे दिसून आले.या गोडावूनमध्ये औषधे व खताने भरलेला जितो टेम्पो,युनिकॉर्न मोटरसायकल व स्कूटी,ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे लवकर शक्य झाले नाही.
आग विझविण्यासाठी विठ्ठलराव शिंदे कारखाना,विठ्ठल सहकारी साखर कारखाना,कुर्डुवाडी नगरपालिका यासह अनेक ठिकाणचे अग्नी शमन बंब मागविण्यात आले.मात्र अरुंद रस्ते,गोडाऊनमधील साठा यामुळे अडचणी निर्माण झाल्या.या आगीत दीड ते दोन कोटी रुपयाचे औषधे,खत व वाहने जळून नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.आग लागण्याची टेंभुर्णीतील एका महिन्यातील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.या अगोदर करमाळा रोड लगत हार्डवेअर, इलेक्ट्रिक साहित्यासह पाच दुकाने आगीत भष्मसात झाली होती.