Modified silencer operation Tembhurni Solapur
टेंभुर्णी : टेंभुर्णी पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी प्रभारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसायांसह वाहतूक नियमभंगाविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. शहरात बुलेट मोटारसायकलींना बसविण्यात आलेल्या कर्णकर्कश सायलेन्सरमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी ३७ बुलेटचे अवैध सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर रोलर फिरवत नष्ट केले.
टेंभुर्णी शहरात अनेक तरुण बुलेटला बदललेले मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवून फटाक्यांसारखा आवाज करत शहरातून फिरत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
अकलूज चौक, करमाळा चौक, कुर्डूवाडी चौक तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी आणि विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी बुलेटसह विविध वाहनांची तपासणी करून बदललेले सायलेन्सर फिटरच्या मदतीने काढून घेतले. त्यानंतर पोलीस ठाणे परिसरात हे सायलेन्सर रोलरखाली टाकून नष्ट करण्यात आले. या कारवाईत ३७ बुलेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यासोबतच काळ्या फिल्म लावलेल्या चारचाकी वाहनांवरही कारवाई करण्यात आली. विशेषतः काही ‘थार’ वाहनांवर नियमभंग आढळून आल्याने त्यांच्या चालकांवर दंड ठोठावण्यात आला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४३ केसेस, मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७ केसेस, परवाना जवळ न बाळगणाऱ्या ८१ केसेस, फॅन्सी नंबर प्लेटच्या ५ केसेस, रिफ्लेक्टर नसलेल्या ५२ केसेस, ओपन फाळका टेम्पो व इतर वाहनांच्या १७ केसेस, सीट बेल्ट न वापरणाऱ्या १७५ केसेस, नंबर प्लेट नसलेल्या १९ केसेस, काळ्या काचा असलेल्या ९ केसेस, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ३२ केसेस, विना परवाना वाहन चालवणाऱ्या ८ केसेस, ट्रिपल सीट ७८ केसेस, हेल्मेट न वापरणाऱ्या ८१ केसेस तसेच पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व इतर १९३ केसेसचा समावेश आहे.
एकूण ८३१ कारवायांमधून पोलिसांनी तब्बल ७ लाख ५० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही मोहीम महामार्ग आणि शहरातील वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, या उद्देशाने राबविण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी सांगितले. कर्णकर्कश सायलेन्सर आणि काळी फिल्म असलेल्या वाहनांवर पुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम व त्यांच्या पथकाने केली.