गुळवंची : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे गुरुवारी (दि.१७) सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. घरातील पाण्याच्या हौदात पडलेला जार काढण्याच्या प्रयत्नात विजेचा तीव्र धक्का लागल्याने आदित्य सिताराम मोहिते (वय १६) या तरुणाचा मृत्यू झाला. आदित्य हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करून घरी परतला होता. यावेळी घरातील पाण्याच्या हौदात एक जार पडलेला त्याला दिसला. तो काढण्यासाठी हौदावर चढला असता, त्याचा हात पत्र्याच्या अँगलला लागला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. घरातल्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने घरातील मुख्य वीजपुरवठा बंद केला, मात्र तोपर्यंत आदित्य हौदात कोसळला होता.
कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने हौदातून बाहेर काढून सोलापूरच्या यशोधरा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
आदित्य हा मोहिते कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ, हसतमुख आणि घरात प्रत्येकाला मदत करणारा होता. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता आणि शहरातील एका महाविद्यालयात त्याने अकरावीसाठी प्रवेशही घेतला होता. त्याच्या या अनपेक्षित जाण्याने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.