सोलापूर

Teachers News: अतिरिक्त कामांच्या ताणामुळे शिक्षकांचे मानसिक आरोग्य बिघडले

प्रभावी अध्यापनासाठी मानसिक विश्रांतीसह कुटुंबासोबत वेळ आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : शिक्षकांवर वाढत चाललेले बीएलओ, जनगणना आणि ऑनलाइन कामांचे ओझे ही शिक्षण व्यवस्थेसाठी गंभीर चिंतेची बाब बनत आहे. उन्हाळी सुट्टीतही शाळा पूर्वतयारी, सततचे ऑनलाईन अहवाल आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यामुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांना मानसिक विश्रांती आणि कुटुंबासोबत वेळ मिळणे तितकेच आवश्यक आहे.

राज्यातील शिक्षकांवर दिवसेंदिवस अध्यापना व्यतिरिक्त विविध शासकीय कामांचा वाढता बोजा पडत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. निवडणूक कामे, जबाबदाऱ्या, जनगणना, विविध सर्वेक्षणे, ऑनलाईन माहिती भरणे, पोर्टल अपडेट करणे आदी कामांमुळे शिक्षकांवरील ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

शिक्षकांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे असले, तरी प्रत्यक्षात त्यांना अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक कामांमध्ये गुंतवले जात आहे. सततच्या ऑनलाईन नोंदी, अहवाल सादर करणे, वेळोवेळी येणाऱ्या सूचना आणि विविध शासकीय मोहिमांमुळे शिक्षकांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ मिळणे कठीण झाले आहे.

ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांना इंटरनेट समस्या, तांत्रिक अडचणी आणि वेळेच्या मर्यादांमुळे अधिक तणावाचा सामना करावा लागत आहे. दिवसभर शाळेतील अध्यापन आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याचे काम करावे लागत असल्याने मानसिक थकवा वाढत असल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. मानसिक ताण वाढल्याने शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना प्रभावी आणि सकारात्मक वातावरणात शिक्षण देण्यासाठी शिक्षक मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. शिक्षकांना मानसिक विश्रांती, कुटुंबासोबत वेळ आणि अध्यापनासाठी पोषक वातावरण मिळणे काळाची गरज बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT