Teacher (Pudhari file photo)
सोलापूर

Teacher Transfer Demand: आम्‍हाला आमच्‍या जिल्‍ह्यात जाऊ द्या

शिक्षकांची ग्रामविकास मंत्र्यांकडे आर्त मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पवित्र पोर्टल मार्फतच्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची सवलत देऊन आम्‍हाला आमच्‍या जिल्‍ह्यात जाऊ देण्याची मागणी शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाने २१ जून २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये टेटच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यात आली. शासन निर्णयातील कलम चार व पाच नुसार नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा अधिकार नाकारण्यात आला आहे. दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास राजीनामा देऊन पुन्हा टेट प्रक्रिया पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट शिक्षकांवर अन्याय करणारी असून, नैसर्गिक न्याय, समान संधी आणि कर्मचारी हिताच्या तत्त्वांच्या विरोधात आहे.

राज्यातील इतर शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांनाही आंतरजिल्हा बदलीचे धोरण लागू करणे आवश्यक आहे. तसेच, अनेक शिक्षण सेवक कुटुंबीय, वैद्यकीय, पती-पत्नी एकत्रीकरण व इतर अपरिहार्य कारणांमुळे बदलीपासून वंचित आहेत. समान संधीच्या तत्त्वानुसार शिक्षण सेवकांनाही निश्चित सेवा अटींसह बदलीचा अधिकार देणे अत्यंत आवश्यक आहे. त्‍यामुळे शिक्षकांना आंतरजिल्‍हा बदलीची सवलत द्यावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे.

शिक्षकांचा भविष्याचा विचार होणे अपेक्षित

राज्यातील पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून आपल्या स्व जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात नोकरी लागलेल्या अभियोग्यताधारकांना शिक्षणसेवक कालावधी संपल्यावर पुढील काळात परत आपपाल्या जिल्ह्यात जाण्यासाठी परत टेट परीक्षा द्यावी लागते ही शोकांतिका आहे. राज्य शासन, शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या भविष्याचा विचार करून त्यांना अंतरजिल्हा बदलीमध्ये सवलती देऊन त्यांना पुन्हा आपल्या जिल्ह्यात पाठवण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT