सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर फसवणूक, हत्येचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण यासह विविध गंभीर १९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी (दि.९) पत्रकार परिषदेत केला.
हे पालकमंत्री नाहीत, तर बालकमंत्री आहेत, असा टोला लगावला. या आरोपांची सखोल चौकशी करून गंभीर प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. दहिवडी, म्हसवड, मिरज, इस्लामपूर आणि सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. १९ गुन्हे असताना मोकोका कारवाई का नाही, असा सवालही त्यांनी केला.
एका प्रकरणात त्यांच्यावर ६ मार्च २०२५ रोजी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचे त्या म्हणाल्या. ८ मे २०२६ रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्याचा दावाही त्यांनी केला. एका महिलेच्या तक्रारीचा संदर्भ देत गोरे यांच्याकडे हे एक कोटी रुपये आले कुठून? असा सवाल केला. मायणी येथील कोविड सेंटर संबंधित २२३ बिलातून गोरे यांचे नाव वगळले आहे.
गोरे कामासाठी १० टक्के मागतात तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांसह सोलापूर विश्रामगृहातील दोन सूटच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.