ऊस दर संघर्ष समिती दिल्लीत करणार आंदोलन 
सोलापूर

Solapur News : ऊस दर संघर्ष समिती दिल्लीत करणार आंदोलन

सोलापूर जिल्ह्यातून एक हजार शेतकरी जाणार; साखरेची आधारभूत किंमत ५० रुपये करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : साखरेची आधारभूत किंमत ५० रुपये करावी, घरगुती वापरासाठी लागणारी व उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या साखरेचा दर वेगळा करावा यासह विविध मागण्यांकरीता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी एकत्रित येत ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने दिल्ली येथील जंतर मंतर येथे दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहोत. आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.

पंढरपूर येथे बुधवार, दि. ३० रोजी ऊस दर संघर्ष समितीच्यावतीने दिल्ली येथील आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सचिन पाटील, दीपक भोसले, समाधान फाटे, प्रा. सुहास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. ऊसाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे कारखाने लवकर सुरु करु नयेत. कारखाने लवकर सुरु केले तर साखर उतारा कमी मिळणार आहे. त्यामुळे कारखानदार यांचे आर्थिक नुकसान तर होणारच आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील नुकसान होणार आहे. गाळप कमी होणार असल्याने कारखाने जास्त काळ चालणार नाहीत. त्यामुळे कारखानदारी अडचणीत येणार आहे. कारखानदारी देखील टिकली पाहिजे. कारखानदारी टिकली तरच ऊस उत्पादक टिकणार आहेत, असे सचिन पाटील यांनी सांगितले.

दीपक भोसले म्हणाले की, दिल्ली येथील आंदोलनाकरीता सोलापूर जिल्ह्यातून ट्रेन तसेच स्वत:च्या वाहनाने एक हजार कार्यकर्ते व शेतकरी जाणार आहेत. याकरीता २ ऑक्टोबर रोजी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा यांनी दिला आहे. ऊस दर संघर्ष समिती सोलापूर प्रा. सुहास पाटील, माऊली जवळेकर, अजित बोरकाटे, निवास नागणे, सालगुडे पाटील, समाधान फाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या

साखरेची आधारभूत किंमत ५० रुपये करावी, ऊसापासूनच्या ईथेनॉलचा दर ७५ रुपये प्रतिलिटर करावा, साखर जीवनावश्यक यादीमधून वगळण्यात यावी, घरगुती वापरासाठी लागणारी व उद्योगधंद्यासाठी लागणारी साखर कोटा वेगवेगळा निश्चित करुन, त्याचे दरही अनुक्रमे ५० रुपये व १०० रुपये करावेत, दोन कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT