सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ शुगरने थकविलेल्या ऊस बिलाविरोधात धाराशिव व सोलापूर येथील शेतकरी गेल्या सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. सहाव्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि.30) खा. प्रणिती शिंदे यांनी आंदोलनास्थळी भेट दिली. तर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी फोनद्वारे आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधून ऊस बिले मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
धाराशिव जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम विषय समितीचे सभापती सिद्धेश्वर कोरे, पंचायत समिती सदस्य गोविंद डोंगरे, विलास राठोड आदी नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. तसेच शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी एक स्वतंत्र्य ॲम्बुलन्स, डॉक्टर, नर्सरी व्यवस्थित केली. तसेच आंदोलनास पाठिंबा असून, बिले मिळेपर्यंत आंदोलन मागे घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलक नेता ॲड. अमोल पाटील, किरणकुमार कापसे, उमेश शिंदे, रावण पवार, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
दोन शेतकरी सिव्हिलमध्ये ॲडमिट
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धाराशिव व सोलापूर येथील शेकडो शेतकरी गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहेत. त्यातील खुदावाडी येथील शेतकरी प्रभाकर कबाडे आणि वागदरी येथील शेतकरी मोहन धुमाळ यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पीटल येथे ॲडमिट ककेल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. आंदोलनाचा शनिवार हा सहावा दिवस होता. शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसलेले आहेत. ऊस गाळपास गेल्यानंतरही ऊसबिले मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत.