Sugar Production 
सोलापूर

Sugar Production: अपुऱ्या पावसामुळे यंदा राज्‍यात साखर उत्‍पादन घटणार

१५ लाख ४८ हजार हेक्‍टरवर ऊस : पावसाअभावी क्षेत्रात होणार घट

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात १५ लाख ४८ हजार हेक्टरवर सध्या उसाचे क्षेत्र आहे. पावसाळा संपत आला असतानाही बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने अपुरी हजेरी लावली. त्‍यामुळे ऊस क्षेत्रात घट होणार आहे. याचा थेट परिणाम आगामी गाळप हंगामावर होणार असून, राज्यातील एकूण साखर उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळत आहेत.

पावसाच्या लहरीपणामुळे आणि सिंचनाच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे ऊस पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. कृषी विभाग आणि मिटकॉन यांनी संयुक्तपणे आगामी हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी व गाळपाचे नियोजन करताना जे आकडेवारीचे अंदाज वर्तवले आहेत, त्‍यापेक्षा ही कमी ऊस गाळपासाठी उपलब्‍ध होणार असल्‍याचे शेतकरी संघटनेकडून सांगण्यात येत आहे.

गाळपास येणार ९९० लाख मेट्रिक टन ऊस

कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५.४८ लाख हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापासून ९९०.७२ लाख मे.टन ऊस गाळपास येण्याचा अंदाज आहे.

सरासरी ११.२५ टक्‍के उतारा

साखर कारखान्‍यांची ११.२५ टक्‍के सरासरी साखर उताऱ्याच्या आधारे आहे. याद्वारे संभाव्य साखर उत्पादन १११.४६ लाख मे.टन राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इथेनॉलसाठी जाणार १५ लाख मेट्रिक टन साखर

इथेनॉल निर्मितीसाठी १५ लाख मे. टन साखर डायव्हर्ट केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात सुमारे ९६.४६ लाख मे.टन (कृषी विभाग) व ९७.५० लाख मे.टन (मिटकॉन) निव्वळ साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदाच्‍या वर्षी राज्‍यातील साखर कारखान्‍याला कमी प्रमाणात ऊस उपलब्‍ध होणार आहे. त्‍यामुळे कारखानदार ऊस घेऊन जाण्यासाठी चढाओढ लागेल. शेतकऱ्यांनी जो कारखाना सर्वाधिक दर जाहीर करेल, त्‍यांनाच ऊस घालावा.
- विजय रणदिवे, जिल्‍हाध्यक्ष, स्‍वाभिमानी शेतकरी संघटना, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT