Subhash Deshmukh 
सोलापूर

Subhash Deshmukh: कोर्‍या ठरावांवरून मतदारयादी; आ. सुभाष देशमुखांची विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार

दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

दक्षिण सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ११ तालुक्यांतून मतदान प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विविध सहकारी संस्थांच्या संचालकांना विश्वासात न घेता कोरे ठराव करून मतदारयादी तयार केली जात असल्याची तक्रार माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे ठराव घेतले जात आहेत. संबंधित ठराव आपल्या बाजूने जास्तीत जास्त व्हावेत, यासाठी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. याच प्रक्रियेत कोरे ठराव घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आ. देशमुख यांनी केला आहे.

त्यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांवर आरोप केले आहेत. काही ठिकाणी अध्यक्ष व सचिव संगनमत करून गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडिंग बुकवर त्यांच्या सह्या घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित प्रोसिडिंग बुक तालुक्यातील एका माजी संचालकाच्या ताब्यात ठेवण्यात येत असल्याचा आरोपही केला आहे. संचालकांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने ठराव करून घेतल्यास त्यांच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सादर होणार्‍या ठरावांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली आहे.

ठराव प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी

प्रत्येक सहकारी संस्थेने ठराव घेताना तो संबंधित संस्थेच्या कार्यालयातच घ्यावा, तसेच जीपीएसद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ठरावाची प्रत सादर करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ठराव घेताना निबंधक कार्यालयाकडून प्रत्येक सहकारी संस्थेसाठी स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT