सोलापूर : सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनात शेतकर्यांना अतिरिक्त 141 कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे पाठविला होता. आता याप्रकरणी तत्कालीन उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
धाराशिव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनात शेतकर्यांना अतिरिक्त मोबदला वाटप करण्यात आल्याच्या तक्रारीवरुन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने याप्रकरणात 141 कोटी रुपयांचा अतिरिक्त मोबदला वाटप करण्यात आल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी सादर केला होता. याप्रकरणात तत्कालीन अधिकार्यांचा बेजबाबदारपणा दिसून येत असल्याने तत्कालीन उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय राज्य शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सोलापुरातील अडीच हजार कुटुंबांचे पंचनामे
सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल, शेळगी, अवंती नगर, बापूजी नगर, एमआयडीसी परिसर आदी भागातील घरात पावसाचे पाणी शिरुन या कुटुंबाचे संसारोपयोगी साहित्यांची हानी झाली होती. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटुंबाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. अतिवृष्टीमुळे सुमारे अडीच हजार कुटुंबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कुटुंबांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.