करमाळा : करमाळा तालुक्यातील स्वयं अर्थ सहाय्यीत खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा काळाबाजार अखेर चव्हाट्यावर आला आहे. अनधिकृत व खासगी वाहनांचा वापर करून विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार शिक्षक भारती संघटनेने उघड केला आहे.
लेखी तक्रारीनंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकलूज यांच्या वायुवेग पथकाने धडक तपासण्या करून तब्बल एक लाख 47 हजार रुपयांचा दंड या शाळांच्या वाहनांवर वसूल करून कारवाई केली आहे.1 फेब्रुवारी 2026 ते 19 मार्च 2026 या कालावधीत केवळ करमाळा तालुक्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 288 वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल 71 वाहने दोषी आढळून आली असून 1 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी खासगी वाहनांवर शाळांची नावे रंगवून त्यांचा सर्रास ‘स्कूल बस’ प्रमाणे वापर केला जात आहे. कोणतीही परवानगी, सुरक्षा नियम किंवा निकष न पाळता या वाहनांमध्ये आसन क्षमतेपेक्षा चार ते पाच पट अधिक विद्यार्थ्यांची कोंबाकोंब केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत केवळ नफेखोरीचा हा उघडपणे सुरू असलेला प्रकार पालकांच्या विश्वासाला तडा देणारा आहे. या गंभीर प्रकारांवर कठोर कारवाई करत वाहन चालक-मालकांसह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी निवेदनाद्वारे केली होती.
तक्रारीची दखल घेऊन परिवहन विभागाने कारवाई करत दंड वसूल केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित एवढ्या गंभीर प्रकरणात केवळ दंड वसुली करून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली का? दोषींवर गुन्हे नोंदवले का? शाळा व्यवस्थापनांवर कोणती ठोस कारवाई झाली का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होत आहे.