Postman Pudhari
सोलापूर

Solapur News : विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी पोस्टमन होण्याची संधी

डाक विभागाचा उपक्रम; गणवेश, प्रमाणपत्रासह ५०० रुपयांचे पोस्टल कूपन मिळणार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भारतीय डाक विभागाने ‘वन डे डाकिया’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयांतील १६ वर्षांवरील विद्यार्थ्यांना एका दिवसासाठी पोस्टमनसोबत टपाल वितरण फेरीत सहभागी होता येणार आहे.

सहभागी विद्यार्थ्यांना पोस्टमनचा गणवेश, स्वयंसेवी सेवेचे प्रमाणपत्र आणि टपाल व पार्सल बुकिंग तसेच टपाल तिकिटे व स्टेशनरी खरेदीसाठी ५०० रुपयांचे पोस्टल कूपन दिले जाणार आहे. हे कूपन एक वर्ष वैध असेल. या उपक्रमाची सुरुवात नव्या वर्षापासून होणार असून दर दोन महिन्यांनी याचे आयोजन केले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालयांमार्फत संबंधित पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून ७ डिसेंबरपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना डाक विभागाचा इतिहास, विविध टपाल सेवा, टपाल वितरण प्रक्रिया व पोस्टमनवर असलेली जबाबदाऱ्यांची माहिती मिळणार आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

वयोमर्यादा : किमान १६ वर्षे

सुरुवात : १ जानेवारी २०२७

नोंदणीची अंतिम तारीख : ७ डिसेंबर २०२६

निवड : प्रत्येक वितरण बीटसाठी एक विद्यार्थी

लाभ : पोस्टमनचा गणवेश व स्वयंसेवी सेवेचे प्रमाणपत्र

पोस्टल कूपन : ५०० रुपये

आयोजन : दर दोन महिन्यांनी

संपर्क : श्रीरंग श्रीहरी रेगोटी, जनसंपर्क निरीक्षक (डाक) – ९९२१३२४८२३

विद्यार्थ्यांना डाक विभागाचे काम केवळ पुस्तकी ज्ञानातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पोस्टमनच्या दैनंदिन कामकाजाची ओळख होण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि समाजसेवेची भावना विकसित होईल.
- हेमंत खडकेकर, वरिष्ठ अवर डाक अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT