सोलापूर : इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे बॅटरीचे तापमान नियंत्रण हे महत्त्वाचे आव्हान बनले आहे. याच पार्श्वभूमीवर ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एअर-कूल्ड ईव्ही बॅटरी आणि एनक्लोजर डिझाइन हा नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
प्रकल्पामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीसाठी हवेच्या माध्यमातून कूलिंग करणारी प्रणाली आणि त्यासाठी आवश्यक एन्क्लोजरची रचना विकसित करण्यात आली. बॅटरीच्या कार्यक्षमतेवर व आयुष्यावर तापमानाचा मोठा परिणाम होत असल्याने सुरक्षित व परिणामकारक उष्णता व्यवस्थापनावर या प्रकल्पात विशेष भर देण्यात आला. बॅटरी पॅकमधील उष्णता प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी योग्य हवेचा प्रवाह, तापमान वितरण आणि हॉटस्पॉट्स टाळण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यात आला.
हा प्रकल्प अथर्व देशमुख, यशराज कल्याणी, मेघा म्हेत्रे आणि संजना इंगळे या विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. प्रकल्पासाठी प्रा. आर. एस. मोटगी यांनी मार्गदर्शन केले. या प्रकल्पाचे संस्थेचे अध्यक्ष एस. ए. पाटील, सचिव एस. एस. पाटील, कॅम्पस डाय. व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते यांनी कौतुक केले. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील शाश्वत आणि किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.