सोलापूर : अक्कलकोट व चिंचोली एमआयडीसीमधील अतिक्रमण काढण्याबाबत सूचना देत, अतिक्रमण करणारे आणि त्यांना मदत करणारे या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हा उद्योग मित्र समिती सभेची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशन, अक्कलकोट रोड व चिंचोली एमआयडीसीचे सदस्य व अधिकारी तसेच महापालिका अधिकारी उपस्थित होते.
यावेळी इंडस्ट्रियल असोसिएशनच्यावतीने औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर मुद्दे मांडण्यात आले. विशेषतः अक्कलकोट एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावरील वीज या प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये टेक्स्टाईल शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पाण्याच्या समस्येसंदर्भात महापालिका आयुक्तांच्या समवेत बैठक घेण्याबाबतही असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केली.
दरम्यान, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये आवश्यक सुविधा पुरविणाऱ्या महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. एमआयडीसीमधील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून 75 टक्के, महापालिकेकडून 12.5 टक्के आणि उर्वरित 12.5 टक्के हिस्सा जिल्हा नियोजन व विकास समितीद्वारे उपलब्ध करून देण्यास सुकाणू समितीने मागील बैठकीत मान्यता दिली होती. याबाबत अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पॉलिटेक्निक कॉलेजचे आर. व्ही. मुंडे, डायरेक्टर यंत्रमाग संघ नारायण आडकी, जयंत अकेन, जनसंपर्क अधिकारी टेक्स्टाईल फाउंडेशन सुजय निकते, इंडस्ट्रियल असोसिएशन सेक्रेटरी शिवशंकर आंधळकर, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे व्यवस्थापक एस. बी. गायकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी एस.टी. राठोड, उपअभियंता बी.पी. खंदारे, आरोग्य संचालक ओंकार चौरे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके उपस्थित होते.