सोलापूर : रेल्वे स्टेशन परिसरातील फॉरेस्ट भागाच्या ताज हॉटेल परिसर, वाडिया हॉस्पिटल आणि केशवनगर भागात मोकाट कुत्र्यांनी रविवारी अक्षरशः धुमाकूळ घातला. येथे एकाच दिवशी चार ते पाच जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये सहा वर्षीय चिमुकल्याच्या दोन्ही पायांचे लचके कुत्र्याने तोडले. या हल्ल्यात चिमुकल्यास गंभीर दुखापत झाली आहे. तर एका महिलेच्या हाताचे कुत्र्याने लचके तोडले आहते.
ताज हॉटेल परिसरात सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत असलेल्या हंजला जहीर शेख (वय ६) याच्यावर अचानक सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या दोन्ही पायांना चावा घेत अक्षरशः लचके तोडले. हंजला हा सोशल इंग्लिश स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिकत आहे. हल्ल्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. याच परिसरात घरासमोर मेहंदी काढत बसलेल्या सोजर रवी काटे (वय ५०) यांच्यावरही कुत्र्याने अचानक हल्ला केला.
यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. एका लहान मुलीवर हल्ला करण्यासाठी कुत्रा धावून गेला. मात्र ती प्रसंगावधान राखून घरात पळाल्याने बचावली. सोजर काटे यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले. वाडिया हॉस्पिटल परिसर, केशवनगर आणि लगतच्या भागातही मोकाट कुत्र्यांनी नागरिकांना लक्ष्य केल्याची माहिती नागरिकांनी दिली. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने मी महापालिकेकडे ऑनलाईन तक्रार केली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना केवळ एकाच वाहनाच्या भरवशावर संपूर्ण शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कसा होणार? कुत्र्यांचा त्रास वाढल्यानंतर तक्रार करण्याची वेळ नागरिकांवर येते आणि त्यानंतरही कारवाईसाठी प्रतीक्षा करावी लागते. हे आमचे दुर्दैव आहे.- अकबर बागवान, नागरिक