Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur Municipal Corporation: स्थायी समितीच्या सभेत १२७ पदे तातडीने भरण्याचा निर्णय

भरतीसाठी टीसीएस - आयबीपीएसमधून निवडीचे आयुक्तांना अधिकार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील रिक्त पदांमुळे विकासकामे आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत असल्याने शासनमान्य १३० पदांपैकी तीन पदे वगळून १२७ पदे तातडीने भरण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

सोलापूर महापालिका स्थायी समितीची सभा सभापती रंजीता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत दोन विषयांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेतील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांची भरती पारदर्शक, विश्वासार्ह आणि गतिमान पद्धतीने करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेणाऱ्या संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी टीसीएस किंवा आयबीपीएस यापैकी योग्य संस्थेची निवड करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला, असे सभापती रंजीता चाकोते यांनी सांगितले.

दरम्यान, महापालिकेतील रिक्त झालेल्या आणखी ३५ वाढीव पदांसाठी शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्या पदांचीही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील मनुष्यबळाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे. आवश्यक कर्मचारी उपलब्ध झाल्यास विकासकामांना गती मिळण्याबरोबरच नागरिकांना अधिक प्रभावी आणि दर्जेदार सेवा देणे शक्य होणार आहे, असे सभापती रंजीता चाकोते यांनी स्पष्ट केले.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत सोलापूर शहरातील मोदी हुडको येथे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामासंदर्भातही स्थायी समितीने माहिती घेतली. या कामाची १ जुलै २०२६ रोजी देण्यात आलेली वर्कऑर्डर आणि कामाच्या सद्यस्थितीबाबत सभेत आढावा घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT