सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सात विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शुक्रवारी सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली असून विशेष निवड सभेत अप्पर जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सातही सभापतींच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले.
महापालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभा पार पडली. यावेळी महापालिका नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी नामनिर्देशन अर्जांची छाननी केली. अर्ज मागे घेण्याची १५ मिनिटे मुदत दिली आणि त्यानंतर एकमेव वैध अर्ज असल्याने संबंधित उमेदवारांना बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
नवनियुक्त सभापतींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सातही विषय समित्यांमध्ये भाजपचे आठ आणि एमआयएमचा एक सदस्य असल्याने पक्षीय बलाबलामुळे सर्वच समित्यांवर भाजपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही सदस्य या समित्यांमध्ये नसल्याने निवडणुकीत कोणतीही चुरस निर्माण झाली नाही.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, विविध विषय समित्यांचे सदस्य, नगरसेवक, नगरसेविका तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर उत्तर मतदारसंघाला सर्वाधिक तीन सभापतीपदे मिळाली असून शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या दोन्ही मतदारसंघांना प्रत्येकी दोन सभापतीपदांचा मान मिळाला.