सोलापूर ः होळी, धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुळेगाव तांडा, गुळवंची तांडा, कामती आणि जवळा येथे अवैध दारुधंद्यांवर कारवाई केली. यामध्ये सात गुन्हे दाखल करुन तीन लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहा. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, पोउनि कुलदीप सोनटक्के, मुजावर यांचे पथक दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील हातभट्टी दारुनिर्मितीच्या दोन ठिकाणी छापे मारुन 39 बॅरेलमधील सात हजार 800 लिटर गुळमिश्रीत रसायन नष्ट केले. तेथील तीन आरोपींविरोधात दोन गुन्हे दाखल केले. मोहोळ तालुक्यातील कामती पोलिस ठाणे हद्दीत दोन गुन्हे दाखल करुन 53 लिटर हातभट्टी दारू, 25 लिटर शिंदी जप्त केली तर सांगोल्यातील जवळा येथे तीन गुन्हे दाखल करुन 141 देशी दारुच्या बाटल्या व पाच लिटर हातभट्टी दारू जप्त केली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली, सपोनि भाऊसाहेब गोसावी, कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोउनि ख्वाजा मुजावर यांच्या पथकाने पार पाडली.