सोलापूर ः एकात्मता बहुउद्देशीय संस्थेच्या मागणीला यश आले असून, 54 मीटर येथे नवीन एस.टी. थांबा झाला आहे. त्यामुळे आता तेथे एस.टी. बस थांबणार असून, त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवाशांना होणार आहे.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते मरिआई चौक दरम्यानचा थांबा पूल पाडल्यामुळे बंद झाला. त्यामुळे देगाव, बसवेश्वर नगर, दमाणी नगर व देशमुख पाटील वस्ती परिसरातील प्रवाशांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर, एकात्मता बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिन शिराळकर यांनी सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे 54 मीटर रस्त्यावर नवीन थांब्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत येथे नवीन एस.टी. थांबा मंजूर करण्यात आला. त्याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या थांब्याचे उद्घाटन जीएम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, एस.टी. स्थानक प्रमुख मल्लिकार्जुन अंजुर्गी आणि वाहतूक नियंत्रण अधिकारी संतोष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बजरंग जाधव, सचिन हक्के, रसूल पठाण, दत्ता जाधव, विजय कंदलगावकर, दिगंबर सर्वगोड, विनायक धोत्रे, योगेश माने व विकी बनसोडे उपस्थित होते. एकात्मता बहुउद्देशीय संस्थेच्या पाठपुराव्याला यश आल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.