सोलापूर : तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने येणार्या एसटी बसने अचानक पेट घेतला. या बसमध्ये 45 प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या बसचा चालक केबिनचा काही भाग यात जळाला. ही घटना तुळजापूर-सोलापूर महामार्गावरील तुळजापूर नाका येथे मंगळवारी (दि. 6) दुपारी बारा वाजता घडली.
मे महिन्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने वाहने पेट घेतल्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली. तुळजापूर आगाराची बस (एमएच 20 बीएल 4226) तुळजापूरवरून सोलापूरकडे प्रवासी घेऊन येत होती.
बस तुळजापूर नाका येथे पोहोचताच इंजिनमध्ये आवाज झाला व धूर आला. त्यामुळे बस चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करुन काय झाले ते पाहिले. त्यावेळी बोनेटमधून आणखीन दूर निघू लागला. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती वाहकाला दिली. त्यामुळे चालक व वाहकाने बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. काही क्षणातच बसणे अचानक पेट घेतला. प्रवाशांना चालकाने सुखरूप बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली. या घटनेत जवळपास एसटीचे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दैनिक ’पुढारी'शी बोलताना सांगितले.
बसच्या चालक कॅबिनमधून सुरू झालेली आग पाहता पाहता पसरली. यात बसचा काही भाग जळाला. सुदैवाने बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला नाही. अन्यथा यापेक्षाही जास्त नुकसान झाले असते. बसने पेट घेतल्यामुळे जुना तुळजापूर नाका येथील एका बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. माहिती मिळताच सोलापूर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तत्पूर्वी चालक केबिनचा भाग आगीत भस्मसात झाला आहे. दरम्यान आगीची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी व अन्य अधिकारी घटनास्थळी पोहचले. यावेळी बसमधील प्रवाशांना दुसर्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठविले.
अचानक लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्र बसवले आहेत. परंतु बहुतांश बसमधील यंत्र निकामी असते. त्यामुळे बसमध्ये बसवलेले यंत्र शोभेसाठी बसवल्याचे दिसून येते.