वाटंबरे : सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस व कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील दोघेजण जागीच ठार झाले. अपघाताची ही घटना सोमवारी (दि. 21 जुलै) सायंकाळी 5.30 वाजता घडली. अपघातात कारमधील राहुल बाबासाहेब आयवळे (वय 34, रा. नाझरे. ता. सांगोला), संदेश लक्ष्मीकांत हेगडे (27, रा. बनपुरी, ता.आटपाडी) या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसच्या चालकाला गंभीर दुखापत झाली. बसमधील काही प्रवासी जखमी झाले.
तुळजापूर कोल्हापूर एसटी (एमएच 20 बीएल 4226) बसला समोरून भरधाव वेगाने जाणार्या कार (एमएच 10 डीव्ही 8099) ने डिव्हायडर तोडून विरुद्ध बाजूने धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्का चूर झाला. एसटी चालक मुकुंद गोरखपुरी गंभीर जखमी झाला. प्रवासी पूजाबाई कारभारी वाघमारे व ईतर प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस अधिकारी भिंगारदेव व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन या ठिकाणी जखमींना उपचारासाठी सांगोला रुग्णालयात पाठवून दिले. तसेच वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. कार चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.