टेंभुर्णी : आडव्या आलेल्या कारला वाचवताना ट्रेलरने साईडने जाणाऱ्या दोन दुचाकींना चिरडल्याची घटना सोलापूर-पुणे महामार्गावर वेनेगाव येथील ब्रिज जवळ घडली. या भीषण अपघातात दोन्हीं दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (दि.26) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रेलर पुण्याकडून सोलापूरकडे निघाला होता. तो वेनेगाव ब्रिजजवळ आला असता ब्रिज खालून उजव्या बाजूने पंढरपूरकडून अचानक कार आली. या सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारला वाचवण्यासाठी ट्रेलर चालक ट्रेलर रस्त्याच्या बाजूला घेत असताना दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक देऊन चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दोन्हीं दुचाकी चालकांच्या अंगावरुन ट्रेलरची चाके गेल्यामुळे दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाजा येथील गस्तीपथक, मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे अधिकारी बालाजी साळुंखे व इतर पोलीस कर्मचारी तसेच टेंभूर्णी पोलिस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी गणेश जगताप, सरडे, अमर पाटील हे हजर झाले होते.