सोलापूर : सोलार प्लांटमधून वायर चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील हे अक्कलकोट विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, वायर चोरणारे दोघे त्यातील तांबे विकण्यासाठी गिऱ्हाईक शोधत आहेत. त्यानुसार त्यांनी कुंभारी ब्रिज येथून दोघांना ताब्यात घेतले. सागर गेनसिध्द माळी (वय 28) आणि अनिल प्रभाकार माळी (28, दोघे रा. लिंबीचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) अशी दोघांची नावे आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये आचेगाव येथील टाटा सोलर प्लांट येथून वायर चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भीमागोंडा पाटील, सलीम बागवान, विजयकुमार भरले, सागर ढोरे पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे यांनी पार पाडली.