मंद्रूप : केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती वापरासाठी 3 किलोवॅटपर्यंत सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यास शासनाकडून कमाल सुमारे 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र, या योजनेच्या नावाखाली ग्रामीण भागात काही भामटे नागरिकांना खोटी माहिती देत दिशाभूल करणारी आश्वासने देत असून सर्वसामान्य नगरिकांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शासनाच्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम मिळवून देऊ, विविध योजनांच्या माध्यमातून 100 टक्के अनुदान मिळेल, संपूर्ण सौरसंच 50 टक्क्यांपेक्षा जास्त अनुदानावरही देऊ अशा फसव्या दाव्यांद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सौरसंचाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा जास्त रकमेची मागणी केली जात असून, भरलेली रक्कम आणि अनुदान ठराविक कालावधीनंतर थेट आपल्या बँक खात्यात जमा होईल, असे खोटे आश्वासन दिले जात आहे. या फसव्या आश्वासनांमुळे सौरसंचही मिळेल आणि दिलेली रक्कमही परत मिळेल या अपेक्षेने अनेक सर्वसामान्य नागरिक आर्थिक फसवणुकीचे बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.