सोलापूर

Solapur News : सोलंकरवाडीत भाजप-राष्ट्रवादीची श्रेयवादाची लढाई

सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्‍या पाण्याचे दोन्ही गटाकडून पूजन

पुढारी वृत्तसेवा

मोडनिंब : सोलंकरवाडी (ता. माढा) येथील ग्रामस्थांच्या तीव्र संघर्षानंतर अखेर सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी गावातील बंधाऱ्यात दाखल झाले आहे. पाणी गावात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले, तरी राजकीय पातळीवर मात्र या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. भाजपचे माजी सभापती शिवाजी कांबळे आणि माढ्याचे आमदार अभिजित पाटील या दोन्ही नेत्यांनी समर्थकांसह वेगवेगळे पाणी पूजन झाले.

गेल्या काही दिवसांपासून सोलंकरवाडीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग आणि आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने बंधाऱ्यात पाणी सोडले. पाणी दाखल झाल्यानंतर गावातील राजकीय गटतट सक्रिय झाले.

भाजपचे माजी सभापती शिवाजी कांबळे व तानाजी मोरे यांनी आपल्या समर्थकांसह आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्यावर जाऊन विधिवत पूजा केली व श्रीफळ अर्पण केले. सीना-माढा योजनेचे पाणी आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा करण्यात आला. तर दुसरीकडे, माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह बंधाऱ्याला भेट देऊन स्वतंत्रपणे जलपूजन केले. आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळे आणि प्रशासनावर दबाव आणल्यामुळेच हे पाणी सुटल्याचा दावा आमदार पाटील यांच्याकडून करण्यात आला.

या दोन्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात उपोषणकर्ते शिवाजी शेळके, गणेश माळी, राजभाऊ भांगिरे, विशाल राजगे, शहाजी यादव व केशव माळी यांचा सत्कार करण्यात आले. या दोन्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपापल्या गटाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT