सोलापूर : येथील सात रस्ता परिसरात असलेल्या सामाजिक न्याय भवनच्या आवारात सांस्कृतिक भवन आहे. या सांस्कृतिक भवनच्या छतावरील पत्रे फाटलेले आहेत. या फाटलेल्या पत्र्यांमुळे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे तर उन्हाळ्यात उन्हाचा कर्मचारी व नागरिकांना त्रास होत आहे.
सामाजिक न्याय भवनच्या आवारातच मुख्य प्रशासकीय इमारतीसह सांस्कृतिक भवन आहे. या इमारतीच्या बांधकामाला तीस-चाळीस वर्षही झालेली नाहीत. कमी दिवसातील या मुख्य इमारतीसह सांस्कृतिक भवनवरील फायबर पत्रे फाटलेले आहेत. फाटलेल्या पत्र्यांमुळे पावसाळ्यात व उन्हाळ्यात या इमारतीचा उपयोगच होत नाही. या सांस्कृतिक भवनमध्ये या विभागाची बैठक, संमेलनासह अन्य कार्यक्रम होतात. पण, सध्या या सांस्कृतिक भवनवरील पत्रे फाटल्याने तेही येथे होत नाहीत. जोराचा वारा सुटल्यास फाटलेले पत्रे उडून अंगावरही पडण्याची भीती आहे. कार्यरत कर्मचार्यांसह कामानिमित्त ये-जा करणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पत्रे बदलण्याची गरज आहे.
सामाजिक विकास योजनेतून मुख्य इमारतीसह सांस्कृतिक भवनची संपूर्ण दुरुस्ती केली जाणार आहे. तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला असून मंजुरी मिळताच दुरुस्ती केली जाईल.- सुलोचना सोनवणे-महाडिक, सहा. आयुक्त, सामाजिक न्याय भवन
सामाजिक भवनमध्ये शहर-जिल्ह्यातील उपेक्षित घटकातील माणूस विविध कामांसाठी येत असतो. या भवनवरील फाटलेल्या पत्र्यांमुळे कर्मचार्यांसह नागरिकांच्या दृष्टीने धोक्याचे आहे. त्याची दुरुस्ती तत्काळ व्हावी.- अतुल गायकवाड, संचालक बाजार समिती
या इमारतीत जात पडताळणीसह अनेक कार्यालये आहेत. यामुळे अनेकजण विविध कामानिमित्त येथे येतात. पत्रा फाटण्यापूर्वीच त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते.- संजना कोरे, जुळे सोलापूर