सोलापूर : पशुपालक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्यावतीने कुरेशी आणि खाटीक समाज दोन व्यावसायिकांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. 7) मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये माकपचे माजी आ. आडम मास्तर, बबलू गायकवाड, एमआयएमचे फारुख शाब्दी, आरीफ शेख, मतीन बागवानसह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट असा मोर्चा निघाला. गेल्या काही दिवसांपासून पशुधन आणि मांस विक्री करणार्यांवर हल्ले होत आहे. खोटे गुन्हे दाखल होत आहेत, असा आरोप असून या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय कांही दिवस बंद ठेवले आहेत. कायदा हातात घेणार्या तथाकथित गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी, पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करून पशुपालक, गाडी चालक व कुरेशी समाजाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू नयेत, सार्वजनिक स्लॉटर हाऊसची उभारणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक तालुका, शहर पातळीवर तातडीने करावी व सुलभ व्यवस्था पुरवावी. गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून एच एफ आणि होमिजीनाईजड पाश्चात्त्य व संकरित बैल यांना कत्तलीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी युवराज पवार, राजाभाऊ कदम, अॅड, गोविंद पाटील, बापू म्हस्के, व्यंकटेश कोंगारी, शौकत पठाण, तौफिक हत्तूरे, अजहर हुंडेकरी, जमीर शेख, अॅड. अब्दुल्ला डोणगावकर, अनिल माने यांच्यासह आदी सहभागी होते.